Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये वनौषधी विभागाचे उद्घाटन; विद्यार्थ्यांमध्ये आयुर्वेदाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा उपक्रम

चिपळूण :

 

चिपळूण : परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण येथे शालेय अभ्यासक्रमातील आयुर्वेद या हितैषी उपक्रमांतर्गत वनौषधी विभागाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी गेली तब्बल ३८ वर्षे वनौषधी विषय शिकविण्याची परंपरा या प्रशालेने जपली असून, यंदाही २२ जून २०२६ रोजी या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात या उपक्रमाचे प्रेरणास्थान डॉ. रत्नाकर थत्ते यांच्या मार्गदर्शनाखाली ध्यान व प्रार्थनेने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व धन्वंतरी पूजन करण्यात आले. इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या स्वागतगीताने कार्यक्रमाला आकर्षक सुरुवात झाली.
प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. बनसोडे सर व उपमुख्याध्यापिका सौ. कारदगे मॅडम यांनी प्रमुख अतिथी डॉ. रत्नाकर थत्ते तसेच वैद्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. चैतन्य खोत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
प्रास्ताविकात विभाग प्रमुख सौ. पेढांबकर मॅडम यांनी आयुर्वेद म्हणजे “आयुष्याचे ज्ञान” असून, रोगांचे उपचार करण्याबरोबरच निरोगी व्यक्तीचे आरोग्य जपणे हा त्याचा मूलभूत उद्देश असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी बालवयातच आयुर्वेदाचे ज्ञान आत्मसात केल्यास त्याचा भविष्यात मोठा लाभ होईल, असे त्यांनी नमूद केले.
मागील शैक्षणिक वर्षातील विद्यार्थिनी अक्षता माटोरे हिने इतर विद्यार्थ्यांसह मनोगत व्यक्त करताना वनौषधी विषयामुळे आयुर्वेदाची प्राथमिक माहिती मिळाली असून, आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारण्यास हा विषय उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले.
मार्गदर्शन करताना डॉ. रत्नाकर थत्ते व डॉ. चैतन्य खोत यांनी बालवयातील संस्कार आयुष्यभर टिकून राहतात, त्यामुळे विद्यार्थ्यांनी योग्य दिनचर्या, संतुलित आहार आणि आयुर्वेदीय जीवनशैलीचा स्वीकार करून निरोगी जीवन जगावे, असे आवाहन केले.
प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. बनसोडे सर यांनी वनौषधी विषय अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रशालेकडून सातत्याने प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. खाडे सर, श्री. मुंढेकर सर, श्री. कदम सर तसेच सौ. माने मॅडम यांनी विशेष सहकार्य केले. विभाग प्रमुख सौ. पेढांबकर मॅडम यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
वनौषधी आणि आयुर्वेद यांसारख्या भारतीय ज्ञानपरंपरेची ओळख विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच करून देण्याचा हा उपक्रम आरोग्यदायी आणि संस्कारक्षम पिढी घडविण्याच्या दृष्टीने निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!