Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

प्रयोगशील शेतकरी अनंत खांबे यांचा प्रशांत यादव यांच्या हस्ते सत्कार

चिपळूण :

चिपळूण (ओंकार रेळेकर) : मांडकी (ता. चिपळूण) येथील प्रयोगशील शेतकरी अनंत बाबाजी खांबे यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल वाशिष्टी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्टचे चेअरमन तथा भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन सत्कार केला.
यावेळी प्रशांत यादव यांनी अनंत खांबे यांचे अभिनंदन करताना, “शेती तोट्याची नसून योग्य नियोजनाची गरज आहे,” हा मोलाचा संदेश आपण आपल्या कृतीतून दिला आहे. त्यामुळे कोकणवासीय म्हणून आपला अभिमान वाटतो. शेतीच्या क्षेत्रात आपल्या हातून असेच नवनवीन प्रयोग घडत राहोत, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, खांबे यांच्यासाठी शेती ही केवळ उपजीविकेचे साधन नसून ती एक प्रयोगशाळा आहे. पारंपरिक शेतीबरोबर आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय शेती आणि शेतीपूरक व्यवसायांची यशस्वी सांगड त्यांनी घातली आहे. माती परीक्षण, ठिबक सिंचन, एकात्मिक कीड व्यवस्थापन यांसारख्या शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करून त्यांनी उत्पादनात लक्षणीय वाढ साधली आहे. त्यामुळे हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या नावाने मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या शेतीनिष्ठेचा योग्य गौरव असल्याचे यादव यांनी नमूद केले.
आजच्या काळात अनेक तरुण शेतीपासून दूर जात असताना अनंत खांबे यांच्यासारखे प्रयोगशील शेतकरी ही कोकणची मोठी आशा असल्याचे सांगत, त्यांच्या कार्यामुळे शेतीला प्रतिष्ठा मिळाली आहे. शासनाच्या या सन्मानामुळे परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळण्याची प्रेरणा मिळेल तसेच त्यांचे कष्ट, चिकाटी आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन पुढील पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.यावेळी भाजपचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, जिल्हा चिटणीस अनिल सावर्डेकर तसेच खांबे कुटुंबीय उपस्थित होते.

फोटो : शेतकरी अनंत खांबे यांचा सत्कार करताना प्रशांत यादव आणि मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!