महाराष्ट्र
चिपळूण लायन्स क्लबतर्फे प्लास्टिक निर्मूलन दिनानिमित्त ५०० कापडी पिशव्यांचे मोफत वाटप
चिपळूण

चिपळूण : प्लास्टिकमुक्त पर्यावरणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी चिपळूण लायन्स क्लबच्या वतीने प्लास्टिक निर्मूलन दिनानिमित्त शहरात ५०० कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळून पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचा स्वीकार करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. ही जनजागृती मोहीम पुढील आठवडाभर सुरू राहणार असून, आणखी १,५०० कापडी पिशव्यांचे मोफत वितरण करण्याचा संकल्प लायन्स क्लबने केला आहे.या उपक्रमात क्लबचे अध्यक्ष श्रीनिवास परांजपे, सहसचिव लायन शाम परांजपे तसेच सहखजिनदार लायन पंकज ओसवाल उपस्थित होते. पर्यावरण संवर्धनासाठी अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्यात येतील, अशी माहिती क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.




