पराग विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज,भांडुप येथील कर्तव्यनिष्ठ शिक्षिका सायली राणे यांची महापौर पुरस्कारासाठी निवड
३२ वर्षांच्या शैक्षणिक सेवेतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय योगदान; भांडुप परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव
भांडुप (ओंकार रेळेकर)महाराष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित पराग विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज, भांडुप येथील प्राथमिक विभागात कार्यरत असलेल्या सहाय्यक शिक्षिका श्रीमती सायली संदेश राणे यांची शिक्षक दिनाचे औचित्य साधून ५ सप्टेंबर २०२६ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका महापौर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. त्यांच्या प्रदीर्घ, गुणवत्तापूर्ण आणि विद्यार्थीहिताच्या कार्याची दखल घेत हा सन्मान जाहीर झाल्याने भांडुप परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सायली राणे गेल्या ३२ वर्षांपासून पराग विद्यालयात कार्यरत असून शिस्तप्रियता, कार्यतत्परता आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये आहेत. विद्यार्थ्यांमध्ये त्या अत्यंत लोकप्रिय असून, केवळ वर्गातील अध्यापनापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात.
गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क, गणवेश, पुस्तके आणि वह्या यासाठी त्या आर्थिक मदत करतात. तसेच परिसरात गृहभेटी देऊन शिक्षणापासून दूर गेलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले आहे. इयत्ता नववीतून शाळा सोडून आई-वडिलांना घरकामात मदत करणाऱ्या दोन विद्यार्थिनींना त्यांनी दहावीच्या परीक्षेला बसण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे या दोन्ही विद्यार्थिनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेत भांडुप मेडिको संस्थेने त्यांना २०२४ मध्ये आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले.
तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणाला नवी दिशा

सायली राणे या अभ्यासू आणि तंत्रस्नेही शिक्षिका म्हणूनही परिचित आहेत. नवीन शैक्षणिक तंत्रज्ञान आत्मसात करून त्यांनी विविध शैक्षणिक व्हिडिओ आणि पीपीटी तयार केले आहेत. उत्कृष्ट निवेदनशैलीमुळे त्यांच्या शैक्षणिक सादरीकरणाला विशेष पसंती मिळाली आहे. तालुकास्तरीय दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत २०२३ मध्ये त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तसेच त्यांनी तालुकास्तरावर तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणूनही काम केले आहे.
शाळेच्या विविध उपक्रमांमध्ये त्या उत्साहाने सहभागी होत असून, गेल्या १० वर्षांपासून दररोजचा दिनविशेष तयार करून तो शाळेच्या दिनविशेष फलकावर लावण्याचे काम त्या सातत्याने करत आहेत.
शाळेच्या गुणवत्तावाढीतही मोलाचे योगदान
शाळेत SQAAF प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी शाळेच्या गुणवत्तावाढीसाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या योगदानातून शाळेला राज्यस्तरीय ‘अ’ दर्जा प्राप्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. यावर्षी त्यांनी इयत्ता दुसरीच्या नवीन अभ्यासक्रमासाठी जिल्हास्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणूनही काम केले आहे.
तसेच शाळेच्या उपक्रमशील आणि गुणवत्तापूर्ण कार्याची नोंद सरल पोर्टलवर होण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या या सातत्यपूर्ण योगदानामुळे पराग विद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता आणि उपक्रमशीलता अधिक ठळकपणे समोर आली आहे.
*पराग विद्यालयाच्या वाढत्या विद्यार्थी संख्येत योगदान*
सध्या अनेक ठिकाणी मराठी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होत असताना पराग विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थी संख्येत मात्र वाढ होत आहे. कर्तव्यनिष्ठ, गुणवंत आणि विद्यार्थीकेंद्री शिक्षकांच्या योगदानामुळे भांडुप परिसरात या सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेने पालकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे आजही या शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी पालकांची धडपड सुरू असल्याचे चित्र आहे.
सायली राणे यांच्या ३२ वर्षांच्या सेवेतून निर्माण झालेली विद्यार्थीप्रिय प्रतिमा, सामाजिक बांधिलकी, शैक्षणिक गुणवत्ता, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि शाळेच्या गुणवत्तावाढीसाठी केलेले कार्य यांची दखल घेत बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने त्यांची महापौर पुरस्कारासाठी निवड केली आहे.
सायली राणे यांना हा मानाचा महापौर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल भांडुप एस वॉर्डमधील विविध शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.महाराष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. बाळकृष्ण बने शेठजी, संस्थेचे सचिव डॉ. सुभाषजी बने साहेब, संचालक मंडळातील सर्व सदस्य तसेच पराग शैक्षणिक संकुलातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद यांनी सायली राणे यांचे कौतुक करून त्यांच्या पुढील शैक्षणिक व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या सायली राणे यांना मिळालेला हा महापौर पुरस्कार त्यांच्या ३२ वर्षांच्या उल्लेखनीय शैक्षणिक सेवेचा गौरव ठरला आहे.
Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!