Welcome to Pavan News 2611   Click to listen highlighted text! Welcome to Pavan News 2611
महाराष्ट्र

गावाच्या विश्वासाला उतराई व्हा, विकासाची नवी दिशा द्या : बबन बांडागळे

मुरादपूरमध्ये पं. स. सदस्य मंगेश बांडागळे यांचा सत्कार; कांचन बोरे हिचाही गौरव

चिपळूण (ओंकार रेळेकर )“गावाने दाखवलेला विश्वास हा केवळ सन्मान नसून मोठी जबाबदारी आहे. त्या विश्वासाला उतराई होत विकासाची नवी दिशा देणे, हेच खरे नेतृत्वाचे लक्षण आहे,” असे प्रतिपादन शिक्षक नेते बबन बांडागळे यांनी केले.

देवरुख लगतच्या मुरादपूर गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य मंगेश बांडागळे हे पंचायत समिती निवडणुकीत भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल श्री सोमेश्वर ग्रामविकास मंडळ, मुरादपूर यांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या वेळी महाराष्ट्र सुरक्षा दलात नियुक्ती झाल्याबद्दल कांचन बोरे हिचाही सन्मान करण्यात आला.मुरादपूर ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमात फौजदार गणेश बांडागळे, रवींद्र बांडागळे, रवींद्र बांडागळे गुरुजी, सरपंच दीक्षा बांडागळे, माजी उपसरपंच नंदकिशोर बांडागळे, माजी सरपंच अनिल बांडागळे, मुजीब साटविलकर, वासुदेव नार्वेकर, स्वरा बांडागळे, दत्ताराम चोगुले, शशिकांत कापदुले, गायत्री बांडागळे, श्रीकृष्णा बांडागळे, रमेश बांडागळे, महेश बांडागळे, ग्रामसेविका तृप्ती कुलकर्णी, खैरून फकीर, तसेच मुरादपूरच्या पहिल्या सरपंच सुप्रिया चौगुले, राजेंद्र महाडिक, नितीन बांडागळे, अजित बांडागळे, वामन बांडागळे, सुभाष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक परशुराम चौगुले यांनी करताना या सत्कारामागील भावना व्यक्त केल्या. “गावातील एक तरुण आज तेरा गावांचे म्हणजेच हातिव पंचायत समितीचे प्रतिनिधित्व करत आहे, ही अभिमानाची बाब आहे. आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या विकास कामांमुळे लोकांचा विश्वास संपादन झाला आणि त्याच जोरावर मंगेश बांडागळे विजयी झाले,” असे ते म्हणाले. तसेच कांचन बोरे हिने महाराष्ट्र सुरक्षा दलात स्थान मिळवून गावाचे नाव उज्वल केल्याचे त्यांनी नमूद केले.दिनेश साबळे यांनी निवडणूक काळातील आठवणी सांगताना मंगेश बांडागळे यांच्या अथक परिश्रमांचा उल्लेख केला. “तेरा गावांतून मिळालेला प्रतिसाद आणि आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून झालेली विकास कामे हेच त्यांच्या विजयाचे मुख्य कारण ठरले,” असे त्यांनी सांगितले.
रवींद्र बांडागळे गुरुजी यांनी पक्षभेद विसरून गावाच्या विकासासाठी एकत्र येण्याचा संदेश दिला. “आपल्या गावातील तरुण पुढे जात असेल तर त्याला साथ देणे ही आपली जबाबदारी आहे. संपूर्ण मुरादपूर गाव त्यांच्या पाठीशी उभे राहिले, हेच त्यांच्या यशाचे खरे बळ आहे,” असे ते म्हणाले.सरपंच दीक्षा बांडागळे यांनीही शुभेच्छा देत भविष्यातील कार्यासाठी विश्वास व्यक्त केला. गौरवमूर्ती कांचन बोरे हिने आपल्या मनोगतात भावना व्यक्त करताना सांगितले, “पोलीस दलात जाण्याचे स्वप्न होते, मात्र महाराष्ट्र सुरक्षा दलातील वर्दी मिळाल्याचे समाधान आहे. आजचे यश पाहण्यासाठी वडील हवे होते,” असे सांगताना तिचा आवाज दाटून आला.सत्कारमूर्ती मंगेश बांडागळे यांनी आपल्या मनोगतात गावकऱ्यांचे आभार मानत सांगितले की, “संपूर्ण गाव, तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबीय यांनी माझ्या विजयासाठी मेहनत घेतली. आमदार शेखर निकम यांच्या नेतृत्वावर आणि केलेल्या कामांवर विश्वास ठेवून जनतेने मला विजयी केले. हा विश्वास मी कधीच विसरणार नाही.” पुढे ते म्हणाले की, “मुरादपूर ग्रामपंचायत परिसराच्या सुशोभीकरणासाठी जिल्हा नियोजन मंडळाकडे दहा लाख रुपयांचा प्रस्ताव पाठवला असून पंचायत समिती सदस्य म्हणून माझे पहिले काम गावासाठीच आहे. तेरा गावांत काम करत असतानाही मुरादपूरकडे दुर्लक्ष होऊ देणार नाही.”
पत्रकार योगेश बांडागळे यांनी मंगेश बांडागळे हे विषय समजून घेतात, अभ्यास करतात, त्यामुळे निश्चितच पहिल्या पंचायत समितीच्या मासिक सभेत त्यांच्या अभ्यासपूर्ण कार्याचे दर्शन घडले. गावाने सरपंच केले, पंचायत समिती निवडणुकीत गाव पाठीशी ठामपणे उभा राहिला, हे कधीही विसरू नका, अशी सूचना त्यांनी केली.अध्यक्षीय भाषणात बबन बांडागळे यांनी मंगेश बांडागळे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना सांगितले की, “ग्रामपंचायतीत दहा वर्षे काम केल्यामुळे त्यांना प्रशासनाची चांगली जाण आहे. आता पंचायत समितीच्या माध्यमातून अधिक व्यापक स्तरावर काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांनी ही संधी साधत विकासाची गती वाढवावी,” असा सल्ला त्यांनी दिला. तसेच भविष्यातही ते राजकीय क्षेत्रात यशाची नवी उंची गाठतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय बांडागळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन रवींद्र बांडागळे यांनी केले.

फोटो : नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य मंगेश बांडागळे यांचा सत्कार करताना बबन बांडागळे आणि मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!