रत्नागिरीत भाजप पदाधिकारी-कार्यकर्ता मेळावा उत्साहात; जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
रत्नागिरी :

रत्नागिरी (ओंकार रेळेकर) भारतीय जनता पार्टी रत्नागिरी जिल्ह्याचा पदाधिकारी-कार्यकर्ता मेळावा रविवारी महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. जिल्हाभरातून आलेल्या पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या मेळाव्याला आमदार प्रसाद लाड, आमदार प्रमोद जठार, आमदार विक्रांत पाटील, भाजप रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, भाजप नेते वैभव खेडेकर, जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, अभिजित गुरव, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा ढेकणे, प्रदेश सचिव सौ. ऐश्वर्या जठार, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद अधटराव, जिल्हा उपाध्यक्ष राजू भाटलेकर, पंचायत समिती सदस्य रुपेश सुर्वे, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. निलम गोंधळी, शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्यासह जिल्ह्यातील आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना विश्वास दिला की, “भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सर्वसामान्य जनतेला त्यांच्या कामांबाबत जी आश्वासने देतील, ती पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी कोणत्याही बाबतीत निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.”
ते पुढे म्हणाले की, राज्य सरकार विकासाला सर्वोच्च प्राधान्य देत असून रत्नागिरी जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, पर्यटन, शिक्षण, आरोग्य, शेती आणि रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी विविध विकासकामांना गती दिली जाईल. जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जनतेशी सातत्याने संपर्क ठेवून शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
मेळाव्यात आगामी संघटनात्मक कार्यक्रम, पक्षविस्तार, बूथ बळकटीकरण आणि जनसंपर्क अभियानाबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. जिल्ह्याच्या विकासासाठी शासन आणि संघटना समन्वयाने काम करतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.




